Alephata News – गॅस सिलिंडरच्या सातत्याने वाढणार्या किमती आणि पुरवठ्यातील अनियमिततेमुळे आळेफाटा परिसरातील हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अनेक छोट्या हॉटेलचालकांना गॅस परवडेनासा झाल्याने काही हॉटेल बंद पडली आहेत, तर काही व्यावसायिकांनी खर्च कमी करण्यासाठी काळ्या ऑइलवर चालणार्या शेगड्यांचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. हॉटेल व्यवसायात दररोज मोठ्या प्रमाणावर इंधन लागते. मात्र कमर्शियल गॅस मिळत नाही. त्यात गॅसचे दर झपाट्याने वाढल्याने आणि वेळेवर सिलिंडर उपलब्ध न झाल्याने छोट्या व मध्यम हॉटेलचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी काही लहान हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसायच बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान, मोठ्या हॉटेल आणि ढाब्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. अनेक हॉटेलांनी खर्च कमी करण्यासाठी आपल्या मेनूमधील अनेक पदार्थ बंद केले आहेत. पूर्वी विविध प्रकारचे नाश्त्याचे आणि जेवणाचे पदार्थ देणार्या हॉटेलांमध्ये आता फक्त एक ते दोनच पदार्थ तयार केले जात असल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिक सिलिंडरची टंचाई. गॅसटंचाईचा परिणाम केवळ हॉटेल व्यवसायापुरता मर्यादित राहिलेला नाही. लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी स्वयंपाक करणार्या केटरिंग व्यवसायिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणावर गॅसची आवश्यकता असताना सिलिंडर उपलब्ध न होणे किंवा वाढत्या दरामुळे स्वयंपाकाचे नियोजन करणे कठीण होत असल्याचे केटरिंग व्यवसायिक सांगतात. मात्र काळ्या ऑइलवर चालणार्या शेगड्यांचा वापर करताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. उपकरणांची योग्य देखभाल आणि प्रशिक्षित कर्मचार्यांकडूनच वापर केल्यास संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात. गॅस दरवाढ आणि तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरातील हॉटेल आणि केटरिंग व्यवसाय सध्या मोठ्या अडचणीत सापडला असून, शासनाने या प्रश्नाकडे लक्ष देऊन इंधनपुरवठा आणि दर नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. काळ्या ऑईलच्या शेगड्यांचा वापर या संकटावर उपाय म्हणून काही हॉटेलचालकांनी काळ्या ऑइलवर चालणार्या शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. या शेगड्यांमध्ये वापरले जाणारे काळे ऑइल स्वस्त असून त्यातून निर्माण होणार्या तीव्र जाळामुळे पदार्थ लवकर शिजतात. साधारण दहा हजार रुपयांच्या खर्चात ही शेगडी बसवता येते. विजेवर चालणार्या छोट्या पंख्याच्या मदतीने जाळ वाढवली जाते आणि दिवसाला सुमारे पाच लिटर ऑइलमध्ये दिवसभर स्वयंपाक करणे शक्य होते, असे हॉटेल व्यावसायिक सांगतात.