Alephata News – परिसरात यंदा झेंडू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून आणि सण-उत्सवांच्या काळात मिळणारी मोठी मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड सुरू केली आहे. आळेफाटा परिसरातील जमीन आणि हवामान झेंडू पिकासाठी अत्यंत अनुकूल असल्याने कमी खर्चात आणि कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता अधिक असते. लागवडीनंतर अवघ्या ६० ते ७० दिवसांत उत्पादन हाती येत असल्याने शेतकऱ्यांना हा आर्थिक उत्पन्नाचा जलद मार्ग वाटत आहे. येणाऱ्या काळात गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांचा विचार करून शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन केले आहे. यामुळे बाजारात फुलांची सातत्यपूर्ण उपलब्धता राहील आणि शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळण्यास मदत होईल. आधुनिक ठिबक सिंचन, खतांचा संतुलित वापर आणि योग्य रोगनियंत्रण करून शेतकरी झेंडूची शेती फुलवत आहेत. विशेषतः मांडव सजावट, हार आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी या फुलांना मोठी मागणी असते. आळेफाटा (ता. शिरूर) : प्रगतशील शेतकरी विजय डोके यांचा बेडवर लागवड केलेला झेंडू. सण आणि उत्सवांची बाजारपेठ गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांदरम्यान झेंडू फुलांची मागणी सर्वोच्च पातळीवर पोहोचते. मंदिरांची सजावट, घरगुती तोरणे आणि सार्वजनिक उत्सवांमध्ये हारांसाठी झेंडूला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांनी हीच संधी ओळखून आपले लक्ष सणासुदीच्या बाजारपेठेवर केंद्रित केले आहे. बाजारपेठ आणि दरातील चढ-उतार स्थानिक बाजारपेठेत झेंडूच्या दरात काही प्रमाणात चढ-उतार होत असले तरी, सणांच्या काळात खूप मागणी असते. सध्या फुलबाजारात झेंडूला समाधानकारक दर मिळत असून, जसजसे सण जवळ येतील, तसतसे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. “झेंडूचा दर्जा उत्तम असल्यामुळे मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्येही या फुलाला विशेष मागणी असते. सण-समारंभांच्या काळात मागणी अचानक वाढते आणि अनेकदा पुरवठा कमी पडतो. यंदा लागवड क्षेत्र वाढल्याने बाजारपेठ स्थिर राहील, मात्र मागणीच्या तुलनेत दर चांगले मिळण्याची अपेक्षा आहे.” – संजय कसबे, फुलव्यापारी