Alandi News: रुग्णांचा श्वास गुदमरतोय! आळंदी-चाकण रस्त्यावर कचऱ्याचे ढीग; प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर
Alandi News: आळंदी-चाकण रस्त्यालगत आणि ओढ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर; कचरा उचलण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

Alandi News – कर्करोगासारख्या गंभीर आजारावर अल्प खर्चात उपचार उपलब्ध करून देणारे आळंदीनजीकचे इंद्रायणी रुग्णालय राज्यातील अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी आधार ठरत आहे; मात्र, रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर साचलेले कचर्याचे ढीग, कुजलेल्या कचर्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रुग्णालयासमोरील आळंदी-चाकण रस्त्यालगत तसेच शेजारील ओढ्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने परिसराचा अक्षरशः श्वास गुदमरला आहे. राज्याच्या विविध भागांतून गरीब आणि मध्यमवर्गीय कर्करुग्ण उपचारासाठी इंद्रायणी रुग्णालयात येतात. आधीच कर्करोगाच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटाशी झुंज देणार्या रुग्णांना रुग्णालयाच्या परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
रुग्णांसोबत येणार्या नातेवाइकांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयासमोरून जाणार्या आळंदी-चाकण रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात आला आहे. शेजारील ओढ्यातही कचर्याचे ढीग साचले आहेत. या कचर्याची वेळेवर विल्हेवाट न लागल्याने तो कुजला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणचा कचरा उचलण्यात आलेला नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कचर्यामुळे माशा, डास तसेच अन्य कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, रुग्णालयाच्या परिसरातील आरोग्य व्यवस्थेवरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणार्या गंभीर आजाराच्या रुग्णांना अशा अस्वच्छ वातावरणातून मार्ग काढावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
आळंदी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून, वर्षभर राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे येत असतात. अशा महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार करणार्या रुग्णालयासमोर कचर्याचे ढीग साचणे ही गंभीर बाब आहे. यामुळे आळंदीच्या स्वच्छतेबरोबरच शहराच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे.
आळंदी नगरपरिषद आणि केळगाव ग्रामपंचायतीने समन्वय साधून रुग्णालय परिसरातील कचरा तातडीने उचलावा. तसेच या ठिकाणी पुन्हा कचरा साचणार नाही, यासाठी नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रुग्णालय परिसराची स्वच्छता राखण्यासाठी नियमित पाहणी करून आवश्यक ती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.






