Alandi News – तीर्थक्षेत्र आळंदी येथे दर महिन्याच्या एकादशीला इंद्रायणी मातेची महाआरती उत्साहात पार पडते. या वेळी हजारो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत भक्तीचा जागर घडतो; मात्र या भक्तिभावासोबतच ‘स्वच्छतेचा ध्यास’ घेण्याची गरज असल्याची भावना आता व्यक्त होऊ लागली आहे. महिन्यातून एकदा महाआरती होत असताना, त्याच दिवशी दुपारी तीन ते सहा या वेळेत इंद्रायणी नदी स्वच्छता उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. सामाजिक संस्था, संघटना, वारकरी बांधव तसेच आळंदीकर नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत इंद्रायणी मातेची स्वच्छता करावी, असे जाणकारांचे मत आहे. भाविकांच्या मते, भक्तीचा जागर जितका महत्त्वाचा आहे तितकाच इंद्रायणीच्या पावित्र्याचा जप करणेही आवश्यक आहे. पूर्वीसारखी निर्मळ व पवित्र इंद्रायणी पुन्हा कशी निर्माण करता येईल, याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. प्रशासनानेही नदी संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. इंद्रायणीच्या उगमापासून संगमापर्यंत औद्योगिक सांडपाणी व मैलामिश्रित पाण्याचा विसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे. विशेषतः पिंपरी चिंचवड शहर परिसरातील औद्योगिक सांडपाण्यावर नियंत्रण आणावे, तसेच नदीच्या दोन्ही काठांवर तटरक्षक भिंती उभारून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी सूचना करण्यात येत आहे. नदीपात्रात थेट सांडपाणी सोडणार्या उद्योगांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय इंद्रायणी स्वच्छ होणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. भक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम घडवत इंद्रायणी स्वच्छतेचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याची अपेक्षा भाविक व्यक्त करीत आहेत. आता प्रशासन व नागरिक यांची संयुक्त कृतीच इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाला गती देणार आहे.