प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दि. १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अर्ज स्वीकारले जात असताना, तिसऱ्या दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजीही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजपर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची एकूण संख्या शून्य आहे. ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ या उक्तीप्रमाणे, इच्छुकांनी आधी कार्तिकी एकादशीचा सोहळा आणि त्यानंतर उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत केवळ काही दिवस शिल्लक असताना, एकाही इच्छुकाने अर्ज दाखल न केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला येत्या काही दिवसांत गती येते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.