Alandi Election: मोठ्या सभांना फाटा, थेट मतदारांशी नातं! आळंदीत भाजपच्या ‘या’ जोडीचा ‘जनसंवाद’ पॅटर्न हिट

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – आळंदी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संतोष रासकर आणि खुशी बोरुंदिया यांनी आपल्या प्रचाराला चांगलीच गती दिली आहे. मोठ्या सभा आणि भाषणांपेक्षा त्यांनी प्रत्यक्ष जनसंवादाचा मार्ग स्वीकारत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या थेट भेटीमुळे प्रभागातील निवडणुकीला उत्साही वळण मिळाले आहे.
रासकर आणि बोरुंदिया यांची प्रचारशैली सर्वांत वेगळी ठरत आहे. एक तरुण महिला उमेदवार म्हणून त्या प्रभागातील प्रत्येक घरातील ज्येष्ठ नागरिक आणि माता-भगिनींचे आशीर्वाद घेत आहेत. विशेषतः महिला मतदार त्यांच्याशी उत्स्फूर्तपणे बोलत असून, महिला सक्षमीकरणावर केंद्रित असलेल्या त्यांच्या अजेंड्याला प्रबळ पाठिंबा दर्शवत आहेत.
या जनसंपर्क दौर्यादरम्यान रासकर आणि बोरुंदिया केवळ आश्वासने देत नाहीत, तर नागरिकांच्या मूलभूत समस्या समजून घेऊन त्यांची नोंद घेत आहेत. प्रभागातील मतदारांकडून त्यांना मिळणारे स्वागत आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता, भाजप पॅनेलने प्रभाग 5 मध्ये एक मजबूत आणि विश्वासार्ह आधार तयार केल्याचे दिसून येत आहे. तरुण आणि विकासकेंद्री नेतृत्वामुळे मतदारांचा कल स्पष्टपणे त्यांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसत आहे.





