Alandi Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष! चऱ्होलीत जादूटोणा-अघोरी प्रथेसाठी चौघांवर गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून जादूटोणा आणि अघोरी प्रथांचा अवलंब केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ डिसेंबर रोजी चऱ्होली खुर्द येथे घडली.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी रविवारी (दि. २८) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एका महिला आरोपीसह सचिन मोरे, राजेंद्र वाकोडे आणि दगडू शिवराम गायकवाड यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपींनी आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून तंत्रविद्येद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून संबंधित आरोपींनी आपले घर या अघोरी कृत्य करण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





