अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ! ‘या’ कारणामुळे स्वीकारला रोल ‘खिलाडी’नं स्पष्टच सांगितलं

मुंबई – मराठी सिनेसृष्टीत सध्या नवं नवीन प्रयोग होताहेत. चांगले कथानक त्यासोबतच व्हीएफएक्स सारख्या तंत्राच्या वापरामुळे प्रेक्षक देखील चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यात हर हर महादेव,सरसेनापती हंबीरराव अशा ऐतिहासिक चित्रपटांनी दमदार यश मिळवल्याने सध्या इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती सुरु असल्याचे दिसून येते. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याची घोषणा मुंबईत एका इव्हेंटद्वारे करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. पृथ्वीराज हे ऐतिहासिक पात्र साकारल्यानंतर अक्षय कुमार आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चित्रपटाबाबतची उत्कंठा वाढली आहे.
म्हणून स्वीकरली भूमिका
अक्षय कुमार मराठी चित्रपटात भूमिका करणार तीही थेट छत्रपती शिवाजी महाराजांची याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. परंतु स्वतः अक्षयने याबाबत खुलासा केला आहे. राज ठाकरेंमुळे ही भूमिका स्वीकारल्याचं अक्षय कुमारने यावेळी सांगितलं. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असही तो यावेळी म्हणाला. तसेच “मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असं मला राज ठाकरे म्हणाले असल्याचा खुलासा देखील अक्षयने यावेळी केला.





