Akola News : कौटुंबिक कलाहातून अकोल्यात टीसीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

अकोला : अकोला येथील मुर्तिजापूरच्या रेल्वे स्थानकावर तिकीट चेकरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुर्तिजापूर येथून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडी समोर येत या तिकीट चेकरने आयुष्य संपवले असल्याची माहिती समोर आली आहे. सुमेध मेश्राम असे या आत्महत्या करणाऱ्या तिकीट चेकरचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घरगुती तणावातून सुमेध मेश्राम यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 40 वर्षीय सुमेध मेश्राम हे घरगुती कारणामुळे तणावात होते. फलाट क्रमांक १ वर कर्तव्य बजावत असताना सुमेध मेश्राम यांनी अचानक मुर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडी समोर उडी घेतली. यात सुमेध मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर सुमेध मेश्राम यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान, घरगुती तणावातून आत्महत्या केल्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.
अकोला येथील तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यकरत असलेले शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी गुढी पाडव्याच्या दिवशीच पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसअपवर स्टेटस ठेवले होते. यात त्यांनी आपली पत्नी आपला मानसिक छळ करत असल्याचे स्पष्ट लिहिल्याचे दिसून आले आहे.





