अकोला : अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत प्रचंड राडा झाल्याची घटना घडली आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख एकमेकांवर धावून गेले. दोघांकडून एकमेकांना प्रचंड अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. भर बैठकीतच राडा झाल्याने या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दलित वस्तीच्या मुद्द्यावरुन सावरकर आणि देशमुख या दोन्ही आमदारांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होती. भर बैठकीत दोन्ही आमदार आमनेसामने आले. दलित वस्तीच्या मुद्द्यावर दोन्ही आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मात्र संतापलेल्या दोन्ही आमदारांचा राग अनावर झाल्यानंतर आमदारांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली. यावेळी उपस्थित अधिकारी, मंत्री आणि आमदारांनी दोघांना आवरल्यामुळे हाणामारीचा प्रसंग टळला.