Akkalkot News : अक्कलकोटमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवात शिवशाहीरीचा जागर; ‘सूर आनंदघन’च्या सुरेल मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध
Akkalkot News : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था व समस्त हिरकणी सखी महिलांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री तुळजाभवानी माता शारदीय नवरात्र महोत्सवातील सांस्कृतिक मेजवानीला अक्कलकोटवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

Akkalkot News : येथील सुप्रसिद्ध श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था व समस्त हिरकणी सखी महिलांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री तुळजाभवानी माता शारदीय नवरात्र महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (Akkalkot News)
मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) शिवशाहीर संतोष साळुंखे यांच्या दमदार वाणीतून साकारलेल्या ‘शिवशाहीरी लोक जागर’ने शिवकालीन इतिहासाचा रोमांचक अनुभव दिला, तर बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर) सावनी रविंद्र प्रस्तुत ‘सूर आनंदघन’ या मराठी गीतांच्या सुरेल मैफिलीने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. (Akkalkot News)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या सहकार्याने तसेच अन्नछत्र मंडळाच्या विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले आणि संस्थेच्या सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही कार्यक्रम अन्नछत्र मंडळ संचलित अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी मैदानावर पार पडले. (Akkalkot News)
शिवशाहीरी पोवाड्यांतून शिवकालीन इतिहासाचा जागर
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवशाहीर संतोष साळुंखे यांनी आपल्या भारदस्त आवाजातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास प्रभावीपणे उलगडला. डफाच्या दमदार थापा, तुणतुण्याची साथ, वीररसाने ओतप्रोत भरलेले पोवाडे, स्फूर्तिगीते आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा आविष्कार यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला. (Akkalkot News)
अफझलखान वध, सिंहगडाची लढाई आणि शिवरायांचा राज्याभिषेक यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण रसिकांच्या अंगावर रोमांच उभे करणारे ठरले. गोंधळ, भारूड आणि शाहिरी रचनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. मनोरंजनाबरोबरच युवा पिढीमध्ये इतिहासाची जाणीव, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमान जागविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. (Akkalkot News)
‘सूर आनंदघन’मधून जुन्या-नव्या गीतांचा सुरेल संगम
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सावनी रविंद्र प्रस्तुत ‘सूर आनंदघन’ या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार व लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रविंद्र, सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकप्रिय मराठी गीतांची सुरेल मैफिल सादर केली. निवेदनाची जबाबदारी दीप्ती भागवत यांनी सांभाळली. (Akkalkot News)
भारतरत्न लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ या टोपणनावाने मराठी चित्रपटांना संगीत दिले होते. त्यांच्याच अजरामर सांगीतिक वारशाला अभिवादन करणाऱ्या या कार्यक्रमात भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते आणि लोकप्रिय मराठी चित्रपटगीतांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. (Akkalkot News)
सावनी रविंद्र आणि ऋषिकेश रानडे यांच्या एका पेक्षा एक सरस व सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. जुन्या आणि नव्या पिढीला जोडणाऱ्या या मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. (Akkalkot News)
मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन
पहिल्या दिवशी श्री तुळजाभवानी माता, श्री समर्थरूपी अन्नपूर्णा माता आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रतिमांचे तसेच नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णाताई मलगोंडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा पार पडला. (Akkalkot News)
दुसऱ्या दिवशी मनोरमा सहकारी बँक, सोलापूरच्या शोभाताई मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नगरसेविका कस्तुराबाई चौगुले, जाहिराबी शेख, अपर्णाताई सिद्धे आणि अमृताताई शिंदे उपस्थित होत्या. (Akkalkot News)
दोन्ही दिवशी हिरकणी सखी महिलांच्या हस्ते कलाकारांचा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्रोच्चारात आरती झाली. पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात तारक मंत्राने करण्यात आली. (Akkalkot News)
यावेळी माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, दर्शना लेंगडे-खोबरे, कु. तेजस्विनीराजे भोसले, कु. स्वामिनीराजे भोसले, दिव्या मोरे, दिलीप सिध्दे, बाबासाहेब निंबाळकर, प्रभाकर मजगे, मनोज निकम, अरविंद शिंदे, अशपाक काझी, प्रदीप तोरसकर, मैन्नोदीन कोरबू, सिध्देश्वर मोरे, प्रवीण देशमुख, निखिल पाटील यांच्यासह परगावचे स्वामी भक्तगण, हिरकणी सखी महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Akkalkot News)
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव श्याम मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त मंडळ, क्रियाशील सदस्य, कार्यकर्ते, सेवेकरी, अमोलराजे लेझीम संघ आणि अमोलराजे भोसले मित्र परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. (Akkalkot News)
शिवशाहीरी लोक जागरातून महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासाचा अभिमान जागवला, तर ‘सूर आनंदघन’ने मराठी संगीताचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. भक्ती, संस्कृती, इतिहास आणि कलेचा संगम घडविणारे हे सांस्कृतिक उपक्रम समाजातील सांस्कृतिक ऐक्य अधिक दृढ करणारे आहेत.
– जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट.

