Akhilesh Yadav : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी निवडणूक आयोगाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला की समाजवादी पक्षाच्या समर्थकांची नावे नियोजित पद्धतीने वगळली जात असून, ही प्रक्रिया पारदर्शक नाही. यादव म्हणाले की, फॉर्म ७ द्वारे मतदारांची नावे वगळण्याची कारवाई केवळ बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मार्फतच सुरू व्हावी. इतर कोणत्याही स्रोताकडून आलेल्या अर्जांवर कारवाई करू नये. तसेच, कोणत्या विधानसभा मतदारसंघात, कोणत्या बूथवर आणि कोणाच्या अर्जावरून नावे वगळली गेली, याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली. Akhilesh Yadav सकाळदिहा येथे सपा आमदाराच्या नावाने बनावट स्वाक्षऱ्या सादर करून १६ मतदारांची नावे वगळल्याचा आरोप त्यांनी केला. बाबागंज विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक ३६५ वर जवळपास १०० मते बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे काढून टाकल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सिकंदरपूर मतदारसंघात सपा आमदाराच्या पत्नीचेही मत वगळण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. अज्ञात व्यक्तींचे सव्वा लाख अर्ज फॉर्म ७ संदर्भातील आकडेवारी देताना यादव म्हणाले की सपाने राज्यात केवळ ४७ अर्ज दाखल केले, तर भाजपकडून १,७२९ आणि अज्ञात व्यक्तींनी तब्बल १,२८,६५९ अर्ज सादर केले. या अज्ञात व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाने अद्याप कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित करत यादव म्हणाले की पक्ष आयोगाची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहे आणि गरज पडल्यास हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित केला जाईल. भाजपवर हल्लाबोल भाजपवर हल्लाबोल करत त्यांनी आरोप केला की महागाई, बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी मतदार यादीत हस्तक्षेप केला जात आहे. आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. या आरोपांमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, निवडणूक आयोगाची भूमिका आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.