लखनौ : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे पुन्हा सुत्रे सोपवण्यास भाजप उत्सुक नाही. भाजप त्यांना निवृत्त होण्यास भाग पाडेल, असे भाकित समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी केले. बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत सप लालूप्रसाद यादव यांच्या राजदला पूर्ण पाठिंबा देईल. उत्तरप्रदेशात भाजप सरकारने केलेले घोटाळे आम्ही बिहारमध्ये उघड करू. तेथील जनतेला सत्य सांगू, असे अखिलेश पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांनी भाजपवर निशाणा साधताना नितीश यांची अस्वस्थता वाढवणारा दावा केला. एकेकाळी नितीश यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची आमची इच्छा होती. मात्र, आता त्यांना मुख्यमंत्री पदावरूनही निवृत्त केले जाईल. भाजप केवळ नितीश यांच्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर करत आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले जाणार नाही, अशी टिप्पणी अखिलेश यांनी केली. बिहारमध्ये नितीश यांचा जेडीयू, भाजप आणि इतर पक्षांचा समावेश असणाऱ्या एनडीएची सत्ता आहे. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी नितीश यांनी विरोधकांना एकत्र आणून इंडिया आघाडी स्थापण्यात पुढाकार घेतला. मात्र, ती निवडणूक जवळ आल्यावर नितीश त्या आघाडीतून बाहेर पडले. त्याचा संदर्भ इंडिया आघाडीचे भाग असणाऱ्या अखिलेश यांनी दिल्याचे मानले जाते.