पिंपरी | आकाशचिन्ह परवाना विभागाची अनधिकृत फ्लेक्सवर धडक कारवाई

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाकडून महापालिकेच्या ’ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी, दापोडी या परिसरात अतिक्रमण विभागाकडून फ्लेक्सवर धडक कारवाई करण्यात आली.
सणासुदीच्या पार्श्वभुमीवर भर चौकात, रस्त्याच्या कडेला फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक, गावठाण परिसर, काशी विश्वेश्वर, नवी सांगवी येथील काटे पुरंम चौक, कृष्णा चौक, क्रांती चौक, साई चौक, फेमस चौक आदी परिसरात मुख्य चौकातील फ्लेक्समुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याने धडक कारवाई करताना दिसून आले.
सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत एकूण 22 फ्लेक्सवर तसेच विद्युत स्ट्रीट लाईट खांबांवरील 242 क्युऑक्स, मोठी लोखंडी शिडी 4, लोखंडी स्टँड 4, लोखंडी पाईप 5, लोखंडी ट्यूब 1, अनधिकृत कमानी 29 यांवर धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रसंगी आदी साहित्य सामग्री ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
ही कारवाई महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, आकाश चिन्ह परवाना उपायुक्त संदीप खोत, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी ग्यानचंद भाट यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश चिन्ह परवानाचे बीट निरीक्षक कालिदास शेळके,
अतिक्रमण विभागाचे निरीक्षक रामचंद्र कांबळे यांच्या उपस्थितीत सदर धडक कारवाई करण्यात येत होती. यावेळी सोबत चार वाहनांचा ताफा, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, 5 कर्मचारी यांच्या सहकार्याने अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
सणसुद व उत्सवांमुळे ज्वेलरी, खाद्यपदार्थ विक्रेते, कार्यक्रम रूपरेषा, मंडळांचे फ्लेक्स, वाढदिवस फ्लेक्स आदींचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. त्यामुळे चौकाला, परिसराला बाधा निर्माण होत होती.
इतकेच नव्हे तर अनधिकृत कमानी उभारण्यात आलेल्या ज्वेलरी व्यावसायिकांवर नियमानुसार दहा हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. – ग्यानचंद भाट, कार्यालयिन अधीक्षक, आकाश चिन्ह परवाना विभाग





