Pune : आयुक्तांच्या इशाऱ्याने अतिक्रमण विभागाला जाग

पुणे : शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात अतिक्रमण विभागाकडून हालचाल होत नसल्याने महापालिका आयुक्तांनी थेट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांना दिले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या अतिक्रमण विभागाकडून आजपासून शहरात कारवाईचा बुलडोझर फिरवला जाणार आहे.
अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागाकडून ही संयुक्त कारवाई केली जाणार आहे. या कारवाईच्या नियोजनासाठी अतिक्रमण विभागाचे प्रमुख संदीप खलाटे यांनी दोन्ही विभागांच्या अतिक्रमण निरीक्षकांची बैठक घेत कारवाईचे वेळापत्रकच त्यांच्या हातात दिले आहे.
शहरात अतिक्रमण विभागास मोठ्या प्रमाणात कर्मचारी देण्यात आल्यानंतरही अनेक प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे ज्या भागात महापालिकेची अतिक्रमण विभागाची स्थिर गस्त आहे, त्याच भागात भरपूर अतिक्रमणे होत असल्याने महापालिका करतेय काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिका आयुक्तांकडेही याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे कारवाई होत नसल्याने आयुक्तांनीच अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता अतिक्रमण विभागाला जाग आली आहे.





