Akash Deep Praises Gautam Gambhir : नुकतीच भारत आणि इंग्लंड संघांत पाच कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने आपल्या पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावर गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. एका सामन्यात 10 विकेट्स आणि दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत त्याने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या यशानंतर आकाश दीपने कोच गौतम गंभीरचे कौतुक केले. गौतम गंभीरचा प्रेरणादायी संदेश – आकाशदीपने पीटीआयशी बोलताना सांगितले की, ओव्हल येथे 66 धावांची खेळी खेळल्यानंतर गौतम गंभीरने त्याला सांगितले, “तुला स्वतःला माहीत नाही तू काय करू शकतोस. मी तुला सांगत होतो, तू हे करू शकतोस. नेहमी असाच समर्पित खेळ करत राहा.” आकाशदीपने गंभीर यांचे कौतुक करताना सांगितले की, “गौतम भाई अत्यंत उत्साही प्रशिक्षक आहेत. ते माझ्या गोलंदाजी आणि फलंदाजीवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतात आणि सतत प्रेरणा देतात.” गिलला शांत स्वभावामुळे मैदानावर योग्य निर्णय घेण्यास मदत – आकाशदीपने कर्णधार शुबमन गिल यांचेही तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, “शुबमन शांत स्वभावाचा आहे आणि त्याच्याकडे अनेक नाविन्यपूर्ण कल्पना आहेत. आयपीएल आणि दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने केलेली कर्णधारपदाची कामगिरी त्याच्या अनुभवाची साक्ष देते. त्याच्या शांत स्वभावामुळे मैदानावर योग्य निर्णय घेण्यास मदत होते.” आकाशदीपने गिल यांच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफी खेळल्याचा अनुभवही शेअर केला. हेही वाचा – AUS vs SA : कॉर्बिन बॉशला ‘ती’ चूक पडली महागात, आयसीसीने केली कठोर कारवाई इंग्लंडच्या खेळपट्ट्या आणि आव्हाने – आकाशदीपने सांगितले की, इंग्लंडमधील खेळपट्ट्या या पारंपरिक इंग्लिश खेळपट्ट्यांपेक्षा वेगळ्या होत्या. “पाचपैकी चार सामन्यांमध्ये गोलंदाजांना फारशी स्विंग किंवा सिम मिळाली नाही. आम्हाला भारतीय शैलीप्रमाणे पूर्ण लांबीवर गोलंदाजी करावी लागली. ज्याने भरपूर क्रिकेट खेळले आहे, त्याला या परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण जात नाही,” असे तो म्हणाला. हेही वाचा – Harbhajan Singh : जवानांचं बलिदान की क्रिकेट? भज्जीने IND vs PAK सामन्यावर मांडलं परखड मत; म्हणाला, ‘रक्त आणि पाणी…’ फिटनेसबाबत काय म्हणाला? आपल्या फिटनेसबाबत बोलताना आकाशदीप म्हणाला, “मैदानावर बाऊंड्री वाचवण्यासाठी डाइव्ह मारताना दुखापत होऊ शकते, पण ती टाळता येत नाही. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच्या दुखापती कमी करण्यावर आमचा भर असतो.” आकाशदीपने आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले असून 28 विकेट्स घेतल्या आहेत. तो केवळ कसोटी क्रिकेटपुरता मर्यादित आहे का, याबाबत त्याला कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या दौऱ्याने आकाशदीपने आपली प्रतिभा सिद्ध केली असून, गंभीर आणि गिल यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्वतःला एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे.