Shirur News : विशेष मुलांच्या आयुष्यात ‘आकांक्षा’ने फुलवला आशेचा किरण
Shirur News : विशेष मुलांना शिक्षण व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अंगभूत क्षमता ओळखून त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

शिरूर : विशेष मुलांच्या शिक्षण, संगोपन, प्रशिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थीपणे कार्यरत असलेल्या राणीताई चोरे यांच्या आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेत संस्थेला ‘सार्थक सेवा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
सार्थक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात प्रदान करण्यात आला. सार्थक संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा स्वाती नामजोशी, प्रमुख पाहुण्या पूनम किर्लोस्कर आणि निरंजन किर्लोस्कर यांच्या हस्ते आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष राणीताई चोरे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
विशेष मुलांना शिक्षण व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अंगभूत क्षमता ओळखून त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. संस्थेच्या या कार्याची समाजाने घेतलेली दखल हा आकांक्षा परिवारासाठी अभिमानाचा व प्रेरणादायी क्षण ठरला.
यावेळी आकांक्षा फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याला हातभार लावण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदतही देण्यात आली. त्यामुळे विशेष मुलांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना अधिक बळ मिळणार आहे.
‘आकांक्षा’ ही केवळ संस्था नसून विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचा एक संवेदनशील प्रयत्न आहे. त्यांच्या क्षमतांना वाव देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचा सेवाप्रवास सुरू आहे. मिळालेला हा पुरस्कार म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नसून प्रत्येक शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विशेष मुलांच्या संघर्षाचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सार्थक फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती नामजोशी, पूनम किर्लोस्कर, निरंजन किर्लोस्कर आणि संपूर्ण सार्थक परिवाराचे आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. “सन्मानासाठी नव्हे, तर विशेष मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी हा सेवाप्रवास असाच अविरत सुरू राहील,” असा निर्धार संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.





