Pune District : अजित पवारांचे विचार आजही जिवंत; आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केला विश्वास
Pune District : याच विश्वासाचा प्रत्यय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातून आला असून जनतेने पक्षाला मोठा कौल दिला आहे, असे मत आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केले.

पिरंगुट : भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील मतदारांचा स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रचंड विश्वास होता. आज ते हयात नसले तरी त्यांचे विचार जिवंत असून तेच विचार जनतेच्या मनात आणि कामात आहेत. याच विश्वासाचा प्रत्यय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातून आला असून जनतेने पक्षाला मोठा कौल दिला आहे, असे मत आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आमदार शंकर मांडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज, कात्रज दूध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुखदेव मांडेकर, गणेश मांडेकर आदी उपस्थित होते.
आमदार मांडेकर म्हणाले की, गेल्या दीड वर्षात भोर, राजगड आणि मुळशी या तीनही तालुक्यांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला असून, याच विकासकामांना जनतेने कौल दिला आहे. जनतेने दाखविलेल्या या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. स्व. अजित पवार यांच्या मनातील आदर्शवत मतदारसंघ घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल, तसेच उर्वरित उणिवा देखील टप्प्याटप्प्याने भरून काढल्या जातील. विकासकामे करताना कोणताही भेदभाव न करता बेरजेचे आणि समन्वयाचे राजकारण केले जाईल.
हिंजवडी हा आपला हक्काचा गट असून तेथे पराभव झाल्याची खंत मनात असल्याचे आमदार मांडेकर यांनी नमूद केले; मात्र एकूणच तीनही तालुक्यांत पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. आज अजितदादा असते, तर त्यांनी फोन करून ‘शंकर, खूप चांगले काम केले आहे’ अशी शाबासकी दिली असती. मात्र आता ते कौतुकाचे शब्द ऐकायला मिळणार नाहीत, हीच मोठी सल आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केली.





