मुंबई – शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भूखंड घोटाळ्यानंतर विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावामुळे हिवाळी अधिवेशनात राजकारण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र देण्यात आले. पण या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नसल्याचे स्पष्ट झाले. यावरून आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. तो एक तांत्रिक मुद्दा आहे असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत आणि अशा पदावरून ते एक पक्षीय काम करताहेत. हा त्यांच्यावर आरोप आहे. ते विरोधी पक्षांना बोलू देत नाही,लोकशाहीचा गळा गोठतात,पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे ते वागतात बोलतात काम करतात असं स्पष्ट मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. नियम पाळले जात नाहीत. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने पक्षपाती वागू नये त्यांनी नियम कायदा आणि घटनेप्रमाणे वागावे. दुर्दैवाने राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नाही अशी खंत राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. विरोधी पक्षाचा आवाज दाबायचा, शिवसेनेला बोलू द्यायच नाही. हे विरोधीपक्षनेते अजित पवार यांना देखील माहिती आहे. त्यांची सही झाली की नाही हे मला माहिती नाही परंतु काल उद्धवजी ठाकरे विधिमंडळात होते तेव्हा काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या अनेक सदस्यांनी त्या प्रस्तावावर सही केली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राष्ट्रवादी देखील आमच्यासोबत येणार असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली. विधानसभा अध्यक्षांविरोधात महाविकास आघाडीचा नाराजीचा सूर होता. जो आता अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून अधिक आक्रमकपणे समोर आला आहे. आता या अविश्वास प्रस्तावावर सत्ताधाऱ्यांकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.