अजित पवारांचा काँग्रेसला धक्का ! आमदार सुलभा खोडके घड्याळ बांधण्याच्या तयारीत

अमरावती : अमरावती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या आमदार सुलभा खोडके या अजित पवार गटात प्रवेश करणार असलयाची चर्चा आता सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या हस्ते विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अमरावती मध्ये आलेले अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर आमदार खोडके यांनी लावले आहेत. यामुळे आता याबाबतची चर्चा जास्तच रंगली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू आहे. महायुती असो किंवा महाआघाडी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते जागा वाटपाबाबत चर्चा करत आहेत. त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढली जात आहे.
अमरावती विधानसभा मतदारसंघातून सुलभा खोडके या विद्यमान आमदार आहेत. या आधी देखील काँग्रेसला मराठवाड्यामध्ये मोठे धक्के बसले आहेत. नांदेड विधानसभा मतदारसंघातील दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात आता काँग्रेसला अमरावतीमधून तिसरा धक्का बसेल असे सध्यातरी मानले जात आहे.





