Ajit Pawar Statue : अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं पुण्यात अनावरण; भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक
Ajit Pawar Statue : 'दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला'

Ajit Pawar Statue : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे जिल्हापरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ आज दिवंगत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
अजित पवार यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्ता भरणे, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित होते. याशिवाय शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. तसेच त्यांनी अजित पवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक
यानंतर भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. “आजचा क्षण माझ्यासाठी भावुक आहे. ज्या झेडपीवर अजितदादांनी प्रेम केले तेथच त्यांचा पुतळा उभारला. लोकांच्या मनात अजित दादांच स्थान मोठं होतं. कामाचा माणूस अशी त्यांची ओळख होती. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदापासून खासदार आणि सात वेळा आमदार होण्यापर्यंतचा दादांचा प्रवास मोठा होता. मात्र, त्यांच्यातील ग्रामीण माणूस कधीही बदलला नाही.”
“अजित पवारांचा रागही लोकांना आपलासा वाटायचा. दादांचा चेहरा शेतकऱ्यांना आपला वाटायचा. त्यांचा रांगडेपणा आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची तळमळ सर्वांनी पाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दादांना नेहमीच आधार होता. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे. दादा, तुमच्या जाण्याने विकासाची जी कामे अपूर्ण राहिली आहेत, ती आम्ही पूर्ण करू,” असा विश्वासही यावेळी सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
Statue
अमित शाह यांची भारतीय जैन संघटनेच्या कार्यालयाला भेट
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय जैन संघटनेच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेत संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी अमित शहा यांना संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आणि भविष्यातील नियोजित उपक्रमांचा आढावा सादर केला.
अमित शहा यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा:





