Ajit Pawar : बंद दारआड चर्चेवर अजित पवारांचा खुलासा म्हणाले “ती भेट….”

Ajit Pawar meets Jayant Patil | पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नियामक मंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीआधी सकाळी अजित पवार आणि जयंत पाटील या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली, अशी बातमी समोर आली. यानंतर जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. तसेच या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, असा प्रश्न विचारला जात असल्याने आता खुद्द अजित पवार यांनी बंददाआड चर्चेबाबात खुलासा केला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आमची भेट झाली. मात्र, त्यात आर्टिफिशल इंटलिजेन्स वापरासंबधी चर्चा झाली. अन्य काही जण तिथे उपस्थित होते. त्यामध्ये राजकीय काहीही नव्हते, असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे उगीच काहीही बातम्या पसरवू नका असा सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला.
एआयचा कृषी क्षेत्रात, ऊस क्षेत्रात वापर करण्यासंबधी जगभर चर्चा सुरू आहे. हा महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळेच अंदाजपत्रकात मी यासाठी ५०० कोटी रूपयांची स्वतंत्र तरतुद केली आहे. वापरासंबधी काय करता येईल यावर विचार करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जयंत पाटील या समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे ते चर्चेसाठी म्हणून आले होते.
बंद दाराआड चर्चा अन्…
काल सकाळी जयंत पाटील यांनी अजित पवार यांची बंद दालनात भेट घेतली. यानंतर मीडियामध्ये दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा असल्याच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामुळे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या. पण यानंतर खुद्द अजित पवार यांनी माध्यमांना माहिती देत असे काहीही नसल्याचा खुलासा करत एआय वापराबाबात चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.





