Beed News : बीडमध्ये अजित पवारांचा मोठा डाव: पंकजा मुंडेंनंतर आता शरद पवारांना धक्का? संदीप क्षीरसागरांसोबतजवळीक वाढली

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. अजित पवार यांनी एकापाठोपाठ धाडसी राजकीय आणि प्रशासकीय निर्णय घेत बीडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ आणि बाबरी मुंडे यांच्या पक्षप्रवेशानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी जवळीक वाढवत अजित पवार दुसरा मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांना शह देण्यासाठी नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत वडवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण राजाभाऊ आणि बाबरी यांनी गेली 35 वर्षे मुंडे कुटुंबाला साथ दिली होती.
संदीप क्षीरसागर यांच्याशी वाढती जवळीक
आता अजित पवार यांचे लक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आहे. क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू केले आहेत. स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान क्षीरसागर यांनी अजित पवार यांना पाय पडून नमस्कार केला आणि त्यांच्या शेजारी बसले.
या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या बीड दौऱ्यातही क्षीरसागर यांनी दोन्ही दिवस उपस्थिती लावली होती.
क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या गटात असूनही बीड शहरात अजित पवार यांचे आभार मानणारे पोस्टर लावले होते, ज्यामुळे राजकीय खळबळ उडाली होती. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजप आमदार सुरेश धस यांच्यासोबत आघाडी घेत पुढाकार घेतला होता. यामुळे क्षीरसागर आणि धनंजय मुंडे यांच्यातील दुरावा स्पष्ट झाला आहे.
धनंजय मुंडेंना शह देण्याची रणनीती
धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वी घनिष्ठ मित्र होते. मात्र, 2023 मध्ये अजित पवार यांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केला, तेव्हा क्षीरसागर यांनी शरद पवार यांची साथ निवडली. आता अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यापासून क्षीरसागर यांच्याशी जवळीक वाढवत असून, धनंजय मुंडे यांना तगडा पर्याय म्हणून त्यांच्यावर गळ टाकण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अडचणीत असून, त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. याच संधीचा फायदा घेत अजित पवार बीडमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.





