निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याला फोडलं?

Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांतरांना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून अनेक नेते महायुतीत सामील झाले, मात्र आता महायुतीतीलच घटक पक्ष एकमेकांना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील हे वातावरण तापले असताना शिवसेना (शिंदे गट) ला मोठा धक्का बसला आहे.
जिल्ह्यातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि मंत्री भरत गोगावले यांचे विश्वासू सहकारी रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला.यामुळे रायगडमधील शिवसेना-राष्ट्रवादी वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीला “राजकीय सुरुंग” लावण्यास सुरुवात केली असताना, राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी पलटवार केला. तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रमेश मोरे आणि त्यांचे सहकारी यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश झाला.
मोरे हे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख असून, गोगावले यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. या कार्यक्रमात तटकरे यांनी मोरे आणि सहकार्यांचे स्वागत करत म्हटले, “राष्ट्रवादीत सामील होणाऱ्या नेत्यांना पक्षाची पूर्ण ताकद देऊ. रायगडमधील स्थानिक निवडणुकांसाठी हे सामर्थ्य वाढेल.”
मात्र, मोरे यांनी शिवसेनेवर जोरदार आरोप केले. “शिवसेना शिंदे गटात अंतर्गत कलह वाढला आहे. नेत्यांना योग्य स्थान मिळत नाही, कार्यकर्त्यांचा सन्मान होत नाही. भरत गोगावले यांचे नेतृत्व चांगले असले तरी पक्षव्यवस्थेत गोंधळ आहे,” असा सल्ला त्यांनी दिला. हा प्रवेश रायगडमधील पनवेल, उरण आणि अलिबागसारख्या महत्त्वाच्या भागातील निवडणुकांसाठी रणनीतिक असल्याचे मानले जात आहे.





