Ajit Pawar : “मंत्रालयात बसून नागरिकांचे प्रश्न कळत नाहीत”- उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मंत्रालयात बसून नागरिकांचे प्रश्न कळत नाहीत, बाहेर फिरायला आलं, की गोष्टी पाहता येतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. त्यांनी बुधवारी सकाळी पुण्यातील शनिवार पेठेतील मेट्रोच्या नव्या पादचारी पुलाला भेट दिली आणि नागरिकांशी चर्चा केली.या वेळी नदीकाठाची स्वच्छता, संभाजी उद्यानातील वाढलेली अस्वच्छता आणि भटकी कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबद्दल उपस्थित नागरिकांनी उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.
शिवाय लहान मुलांसाठी खेळण्याची जागा व ओपन जीम बांधण्याच्या मागणीची नोंद घेतली. या वेळी नव्याने बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचा फायदा झाला असून, तसाच दुसरा पूल भिडे पुलापाशी बांधण्यात येत आहे. तो डिसेंबरमध्ये नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, अशीही माहिती पवार यांनी दिली. या वेळी त्यांनी मेट्रोने केलेल्या पुलाच्या कामाचे कौतुक करून काही सूचनाही केल्या.
जंगली महाराज रस्त्याला पेठेशी जोडणाऱ्या भिडे पुलाचे देखील ऑडिट केले जाणार असून, कुंडमळा इथे झालेल्या अपघातानंतर दिलेल्या आदेशांमध्ये सर्व जुन्या पुलांचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. त्यानुसार धरणासमोरील पुलाची स्थिती बिकट झाली असल्याचे मान्य करत त्या जागी दुसरा पूल बांधण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेण्याबद्दल प्रश्न केला असता, प्रत्येकाला कोणाला भेटण्याचा किंवा न भेटण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत अशा भेटी होत असतात. लोकशाहीत लोकं तक्रार करत असतात, तर ज्यांच्याकडे तक्रार झाली, त्यांनी त्याची नोंद घ्यायची असते. त्यातून पारदर्शक निवडणुका होण्याच्या दृष्टिकोनातून शंका आणि सूचनांकडे निवडणुक आयोगाने लक्ष घातले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.





