Ajit Pawar : पिंपरी-चिंचवडचा ‘शिल्पकार’ हरपला; पहाटे ६ चा तो ‘वचक’ आता कायमचा थांबला!
Ajit Pawar : बारामती जन्मभूमी पण पिंपरी-चिंचवड कर्मभूमी; राजकारणापलीकडचा एक 'वक्तशीर' प्रवास!

Ajit Pawar – पिंपरी चिंचवड शहर आणि अजित पवार हे एक समीकरण बनले होते. सन १९९२ पासून अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहरात लक्ष घालत या शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. शहराच्या भविष्यातील गरजा ओळखून याठिकाणी भौतिक सोयी-सुविधा उभारल्या. त्यांच्या काळात खऱ्या अर्थाने शहराने गगनभरारी घेतली. शहराच्या राजकारणात त्यांचा जसा दबदबा होता, तसाच वचक प्रशासनावर होता.
त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहराच राजकारण आणि समाजकारण अळणी झालय.बारामती ही अजितदादांची जन्मभूमी. मात्र, पिंपरी चिंचवड ही कर्मभूमी असल्याचे सांगत त्यांनी पिंपरी चिंचवडचा झपाट्याने विकास केला. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात पिंपरी चिंचवड शहरामधून झाली. सन १९९१ साली त्यांनी पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी पिंपरी चिंचवड हे बारामती लोकसभेत होत. त्यावेळी त्यांना शहरातून भरभरून मतदान झाल होत.
ज्या शहरासाठी आपण काही केल नाही त्यांनीही इतक भरभरून मतदान केल्यानंतर अजितदादांनी या शहरासाठी काहीतरी करण्याचे ठरवले. पुढे त्यांना खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यातील राजकारणात सक्रीय करण्यात आलं. त्यानंतर तर त्यांनी शहरात अधिक झपाट्याने कामे हाती घेतली. अजितदादांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिकेवर सलग १५ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती.
या कालावधीत पिंपरी चिंचवडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. हे शहर एक मिनी भारत असून याठिकाणी सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. औद्योगिकनगरी असून भविष्यात शहराची लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे. हे लक्षात घेत भविष्यातील गरजांवर त्यांनी सखोल अभ्यास केला.भविष्यातील दळणवळणाची गरज ओळखून त्यांनी रस्ते सुसज्ज करण्यास प्राधान्य दिले. जुन्या पुणे मुंबई महामार्गाचे रुंदीकरण करत दापोडी ते निगडी ग्रेडसेपरेटरची बांधणी केली.
नाशिक फाट्यावरून नाशिककडे जाताना भोसरीगावात उड्डाणपुलाची निर्मिती केली. हा उड्डाणपूल सुरूवातीला दोन लेनचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, भूमिपूजनाच्यावेळी अजितदादांनी काम वाढवून चार पदरी उड्डाणपूल करण्याचे आदेश दिले. अशा पद्धतीने शहरात अनेक ठिकाणी उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, रस्ते बांधत त्यांनी पिंपरी चिंचवड खऱ्या अर्थाने दळणवळणाच्या बाबतीत समृद्ध केले. ही विकासकामे करत असताना कुठेही पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली.
लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी शहरात उद्यानांची निर्मिती केली. त्यांच्या काळात शहरात तब्बल दोनशेहून अधिक छोटी-मोठी उद्याने तयार झाली. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी पिंपरी चिंचवडला नेहमीच झुकते माफ दिले. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांसाठी राज्य व केंद्राचा निधी त्यांनी मिळवून दिला.
त्यांच्या मदतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकासकामांची गंगा आली. मात्र, त्यांच्या अकाली जाण्याने आज खऱ्या अर्थांने पिंपरी चिंचवड शहराच राजकारण आणि समाजकारण बेचव झालं आहे. कामाचा माणूस केल्याने हे शहर पोरकं झाल्याची भावना राजकीय पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य व्यक्त करत आहे.
प्रत्येक घटकाला सोबत घेत विकासकामे
केंद्रात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी केंद्र सरकारचा तब्बल २६०० कोटी रुपयांचा निधी जवाहरलाल राष्ट्रीय नागरी पुननिर्माण अभियानाअंतर्गत मिळूवन दिला. त्यामुळे शहरातील विकाससकामांना गती मिळाली. या निधीतून घनकचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण, पाणी आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लागले. त्यासोबतच बस सुविधा जलद होण्यासाठी बीआरटी मार्गाची उभारणी केली.
मुंबई पुणे महामार्गावर शहराच्या मध्यवर्ती भागात ३३ एकर जागेमध्ये त्यांच्या दूरदृष्टीने मध्यवर्ती व्यापार केंद्र साकारले जात आहे. मोशी येथे दोनशे एकर जागेमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची त्यांनी उभारणी केली. शहरातील महत्वाचे असलेले सायन्स पार्क त्यांच्या कारकीर्दीत उभारण्यात आले. प्रा, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, आचार्य अत्रे नाट्यगृहाची उभारणी केली.
महापालिकेत त्यांची सत्ता असताना महिलांसाठी त्यांनी विविध योजना आणल्या. त्यामध्ये बिनव्याजी कर्ज योजना, शिवण यंत्र वाटप योजना, संगणक प्रशिक्षण अशा महत्वाच्या योजनांचा समावेश होता. महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत महापालिकेच्या १३ मजली इमारतीच्या बांधकामाला सुरूवात केली.
वक्तशीरपणाने अधिकाऱ्यांची धावाधाव
पिंपरी चिंचवड ही अजितदादांची कर्मभूमी. ते खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडचे शिल्पकार होते, हे त्यांचे राजकीय विरोधक देखील नाकारू शकत नाही. कामांचा दर्जा व गुणवत्ता राखण्यासाठी त्यांचा विशेष आग्रह असायचा. त्यासाठी प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन ते पाहणी करायचे. अनेक भूमिपूजन, कामाचे उद्घाटन करण्यासाठी भल्या पहाटे ते शहरात दाखल होत. सहा वाजताची वेळ ठरली की त्या सहाच्या ठोक्याला दादा कामाच्या ठिकाणी हजर असत. त्यांच्या या वक्तशीरपणाने पालिकेच्या अधिकाऱ्यांची देखील धावाधाव व्हायची.
–
Remarks :






