Amol Mitkari : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. अहवालानुसार विमान प्रथम झाडावर आदळून नंतर जमिनीवर कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘VSR Ventures’चे मालक रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान मुख्य वैमानिकाच्या सीटवर झोपलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “रोहित सिंहला अटक करा” अमोल मिटकरी यांनी सरकारकडे VSR Venturesचे मालक रोहित सिंह यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात सखोल चौकशीसाठी DGCA च्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. “आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारने कारवाई केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लढा उभारतील,” असा इशाराही मिटकरी यांनी दिला. जय पवार यांची भावनिक प्रतिक्रिया जय पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना कायम राहील. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.” त्यांनी DGCA कडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत, चौकशी पूर्ण होईपर्यंत VSR ची सर्व विमाने ग्राउंड करण्याची मागणी केली आहे. तसेच रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशीही त्यांची मागणी आहे.