Rohit Pawar : अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणावर विधानसभेत चर्चा होऊ दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार म्हणाले की, आम्ही अनेक दिवसांपासून या विषयावर अधिवेशनात चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. मी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली असून, उद्या किंवा सोमवारी या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी हेही या मुद्द्यावर चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा विषय दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. VSR ला वाचवलं जातंय या प्रकरणात VSR कंपनीला जाणीवपूर्वक वाचवले जात असल्याचा गंभीर आरोप करत, यामागे ‘कोणीतरी मोठा माणूस’ असल्याचे रोहित पवार म्हणाले. सरकारवर दबावाचा आरोप “माझ्याकडे मोठी माहिती आहे. काही गोष्टी आम्ही समोर आणल्या आहेत. सरकारने योग्य पाऊल उचललं नाही तर उर्वरित माहितीही सार्वजनिक करू,” असा इशाराही त्यांनी दिला. यासोबतच सत्तेत असलेल्या नेत्यांवर टीका करत, “तुम्ही स्वतःच्या माणसाला न्याय देऊ शकत नाही, तर इतरांना काय न्याय देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ED चौकशीवरही भाष्य ED ने दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते, मात्र कोणताही गैरप्रकार नसल्याने क्लीन चिट मिळाल्याचा दावा त्यांनी केला. “यंत्रणांवर दबाव होता, पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहिलो,” असे ते म्हणाले. अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण अजित पवार यांचा विमान अपघात 28 जानेवारी रोजी झाला होता. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून, 29 जानेवारीला बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. या घटनेनंतर रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच घातपाताचा संशय व्यक्त केला असून VSR कंपनी आणि DGCA अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.