Ajit Pawar Death : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बारामतीजवळ झालेल्या या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर डाउनलोड तपास यंत्रणांनी विमानातील डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) यशस्वीरीत्या डाउनलोड केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अपघाताच्या क्षणी विमानाची गती, उंची, तांत्रिक स्थिती आणि पायलटच्या हालचालींबाबतची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वी सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) उष्णतेमुळे काही प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे तांत्रिक तज्ज्ञांकडून त्यातील माहिती पुनर्प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घातपाताचा संशय कायम या अपघाताबाबत आमदार रोहित पवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी दोन पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले, तर जय पवार यांनी सोशल मीडियावर निष्पक्ष चौकशीची मागणी केली. संबंधित विमान कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अपघात कसा घडला? २८ जानेवारी रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघाले होते. मात्र बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. या दुर्घटनेने संपूर्ण राज्याला हादरा बसला असून राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता डिजिटल डेटा रेकॉर्डरमधील माहितीच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्राथमिक अहवालाकडे लागले आहे.