Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले आहे. या धक्कादायक बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, या भीषण अपघातानंतर आता सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून, चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. विमान नक्की कशामुळे कोसळले आणि यात कोणाचा हलगर्जीपणा होता, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या प्रशासनाकडून कोणत्याही एका कारणावर शिक्कामोर्तब करण्यात आले नसले तरी, पाच प्रमुख प्रश्नांनी विमान वाहतूक विभागाला घेरले आहे. १. लँडिंगच्या वेळी नक्की काय घडले? केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. मात्र, विमान धावपट्टीवर उतरत असताना नेमका कोणता बिघाड झाला आणि तो इतका गंभीर कसा होता की वैमानिकाला नियंत्रण मिळवता आले नाही, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. Ajit Pawar passed away : २. दोन प्रयत्नांनंतरही अपयश का? मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या विमानाचे लँडिंग करण्यासाठी एक नव्हे तर दोन वेळा प्रयत्न करण्यात आले होते. पहिल्या प्रयत्नात परिस्थिती अनुकूल नसल्याने वैमानिकाने पुन्हा लॅंड केले मात्र दुसऱ्या प्रयत्नात विमान कोसळले. या दुसऱ्या प्रयत्नावेळी सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का? ३. ‘व्हिजिबिलिटी’बाबतचा संभ्रम? मीडिया रिपोर्ट्सनुसार, लँडिंगच्या वेळी दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती, ज्यामुळे अडथळे निर्माण झाले. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये सर्वकाही स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला जात आहे. जर दृश्यमानता पुरेशी होती, तर व्हिजिबिलिटीचे कारण कितपत बरोबर आहे? ४. जोखीम का पत्करली? जर खरोखरच दृश्यमानता कमी होती, तर लँडिंगची जोखीम का पत्करली? विमान दुसऱ्या जवळच्या विमानतळावर का वळवण्यात आले नाही? ५. ‘लिअरजेट-४५’ विमानाची सुरक्षा धोक्यात? अजित पवार ज्या ‘लिअरजेट-४५’ (Learjet-45) विमानातून प्रवास करत होते, त्याच कंपनीच्या दुसऱ्या विमानाचा २०२३ मध्ये अपघात झाला होता. सुदैवाने त्या वेळी सर्व प्रवासी वाचले होते, पण तेव्हापासून या विमानांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशा परिस्थितीत या विमानाला उड्डाणाची परवानगी कशी मिळाली? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी होत असून, संपूर्ण महाराष्ट्र सध्या शोकसागरात बुडाला आहे. हेही वाचा – Ajit Pawar : उद्या होणार अजित दादांवर अंत्यसंस्कार.! बारामतीत लोकांची मोठी गर्दी