Ajit Pawar : अजित पवारांना अखेरचा निरोप..! पार्थ पवार आणि जय पवार यांनी दिला लाडक्या बाबांना अग्नी
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. आज (२९ जानेवारी) त्यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी काहीवेळ त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते.
त्यानंतर काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठान येथे आली तेव्हा याठिकाणी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर आणण्यात आले त्यावेळी याठिकाणी शोकाकुल वातावरण होते.
अजित पवार अखेर अनंतात विलीन झाले असून पार्थ पवार आणि जय पवार यांनी लाडक्या बाबांना अग्नी दिला. अंत्यसंस्काराच्या वेळी परिसरात शोकाकुल वातावरण असून कार्यकर्त्यांचा आक्रोश सुरू आहे. पोलिसांकडून मानवंदना दिली जात आहे.
या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. संपूर्ण बारामती शहर शोकसागरात बुडाले असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे.





