Shashikant Shinde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात या पक्षाची दिशा आणि राजकीय रणनिती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र येणार का? याबाबत सर्वांना प्रश्न पडला आहे. यावर राष्ट्रवादीचे (शप) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी वक्तव्य केले आहे. शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, आता सत्य बोलणे गरजेचे आहे. महानगरपालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ, असे अजित पवार यांनी म्हटले होते. अजितदादा हे शरद पवार यांच्याकडे पाहूनच बोलत होते. त्या अनुषंगाने काही बैठकाही पार पडल्या होत्या. आता त्यादृष्टीने आमची वाटचाल होणार असल्याचे सूचक विधान शशिकांत शिंदे यांनी केले आहे. Ajit And Sharad Pawar दरम्यान, खासदार सुनेत्रा पवार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे संघटनात्मक किंवा थेट राजकीय अनुभव नसल्याने ही बाब पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. तसेच, मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडेही नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याइतका पुरेसा अनुभव नसल्याचे बोलले जात आहे. तसेच, भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यामुळे, राष्ट्रवादी(शप)चे अध्यक्ष शरद पवार हे जर भाजपासोबत युतीसाठी तयार असतील, तरच हे नेते त्यांना साथ देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीची कमान सुनेत्रा पवार यांनी हाती घ्यावी आणि उपमुख्यमंत्रीपदही सांभाळावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला जाईल. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या प्रस्तावावर चर्चेसाठी राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता आहे. हे पण वाचा : Ajit Pawar : अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा