मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांना अजितदादांचा वादा; ‘मास्टरमाईंडला सोडणार नाही…’

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे या प्रकारांची चर्चा राज्यभरात होत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मस्साजोग गावात दाखल झाले. संतोष देशमुख प्रकरणात कुणीही मास्टरमाईंड असेल त्याला सोडणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना दिला.
अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ही घटना फार वेदनादायी, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. संतोष यांच्या हत्येची न्यायालयामार्फत तसेच कुणाचाही दबाव येऊ नये, यासाठी आयजी लेव्हलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फतही चौकशी करत आहोत, असे अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना सांगितले.
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार –
संतोष देशमुख यांचे मारेकरी तसेच या मागचा मास्टरमाइंड कोणीही असला, तरी त्यांना सोडणार नाही. तुम्ही अजिबात घाबरू नका. वेळ पडल्यास तुम्हाला पोलिस बंदोबस्त देऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आपण तयार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील तपासात कुठल्याही परिस्थितीत राजकीय हस्तक्षेप होणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोषींना फाशीची शिक्षा होईल. या मागील मास्टरमाइंड जो कुणी असेल, त्याला सोडणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिले. या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणावर सरकारचे आम्हा सर्वांचे बारकाईने लक्ष आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास होईपर्यंत मी व्यक्तीश: त्याठिकाणी लक्ष देईन आणि कुणालाही सोडले जाणार नाही, अशी खात्री अजित पवार यांनी मस्साजोग ग्रामस्थांना दिली.
देशमुख हत्याकांडाची पार्श्वभूमी काय ?
गत 6 डिसेंबर रोजी प्रतिक घुलेसह इतर काही लोकांनी मस्साजोग भागात होणाऱ्या एका खासगी कंपनीच्या प्रकल्पस्थळी येऊन सुरेश सोनवणे व प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदे यांना जबर मारहाण केली होती. त्यांच्यावर सदर कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर मस्साजोगचे रहिवाशी असणाऱ्या वॉचमन अशोक सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर 6 तारखेलाच केज पोलिस ठाण्यात घुलेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 3 दिवसांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
बीडमध्ये शरद पवार काय म्हणाले ?
शरद पवार यांनी मस्साजोग गावातील जनतेला धीर देत संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खोलात जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत केली आहे. पण या मदतीने दु:ख कमी होत नाही. त्यामुळे या हत्याप्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तातडीने धडा शिकवला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. मी इकडे आलो याचं कारण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेली गोष्ट ही राज्याला न शोभणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे. ते दु:खी आहेत. आपण त्यांच्यासोबत आहोत. पण येथील स्थिती कशी दुरुस्त होईल, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.





