Dhananjay Munde : अजित पवार बीडमध्ये; तर धनंजय मुंडे फॅशन शोमध्ये; आजारपणाचं कारण देत दौऱ्याला दांडी

Dhananjay Munde | उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार काल बीड दौऱ्यावर होते. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळी हजर राहू शकत नाही असे सांगणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आदल्या रात्री मात्र मुंबईतील एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. या फॅशन शोमध्ये मुलीने भाग घेतल्याने धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती. त्याचे फोटो आता समोर आले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही.
माझ्या अनुपस्थितीबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती, असे धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर म्हंटले होते. मात्र, धनंजय मुंडे यांनी आदल्या दिवशीच मुंबईतील एका फॅशन शोमध्ये हजेरी लावल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. Dhananjay Munde
अजित पवारांच्या दौऱ्याला दांडी मारून धनंजय मुंडे फॅशन शोमध्ये
धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्याला प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत दांडी मारली. मात्र, आदल्या दिवशी ते मुंबईतील फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मंगळवारी रात्री मुंबईत आयोजित एका फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते. त्यांची मुलगी वैष्णवीही या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
एकीकडे प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगितले आणि पालकमंत्र्यांच्या आणि स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित होत्या
दरम्यान, बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. जिल्ह्यातील विकासकामी, योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस उपस्थित होते.




