प्रभात वृत्तसेवा पुणे – खडकवासला मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेताना वेळेवर हजर नसलेल्या एका अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सर्वांसमोर खडे बोल सुनावले. दुसरीकडे नागरिकांच्या आग्रहामुळे काहीसे संतप्त होत एक तर देव-देव तरी करायला लावा किंवा विकासकामे तर करू द्या, असे म्हणत त्यांनी हात जोडल्याचे दिसून आले.उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्याची सुरुवात वारजेतील चौधरी चौकातून झाली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांच्या इतर समस्या त्यांनी जाणून घेतल्या. विकासकामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याचे सक्त आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.अजित पवार अहिरे गावातील समस्या जाणून घेताना रिंग रोड, रस्त्यांच्या कामांबाबत चर्चा सुरू होती. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) एक अधिकारी वेळेवर उपस्थित नव्हते. काही मिनिटांनी अधिकारी पोहोचताच अजित पवार त्यांच्यावर संतापले. वसईकर कुठे जाऊन बसता हो तुम्ही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला झापले. केवळ दोन मिनिटे उशीर का झाला, याची विचारणा करत त्यांनी संबंधितांची सर्वांसमोर कानउघडणी केली. पुलाची उंची वाढवा.. वारजेनंतर अजित पवार यांनी शिवणे, नांदेड सिटी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास शिवणे पूल पाण्याखाली जातो, ही समस्या नागरिकांनी मांडली. याची दखल घेत त्यांनी पुलाची उंची वाढवण्याचे आदेश दिले. तसेच, धायरीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित धायरी डीपी रोड आणि कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचाही आढावा घेतला. अन् दादांनी हात जोडले.. अहिरेमध्ये स्थानिकांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. पवार एकामागून एक सूचना अधिकाऱ्यांना देत असतानाच काहीजणांनी त्यांना जवळच्या मंदिरात येण्याचा आग्रह धरला. पहाटे पाच वाजल्यापासून दौऱ्यावर असल्यामुळे थकलेले अजित पवार यामुळे काहीसे संतापले. ते म्हणाले, मी पहाटे पाच वाजता उठतो. एक तर मला देव-देव करायला लावा किंवा विकासकामे करायला सांगा. असे सुनावत त्यांनी नागरिकांसमोर हात जोडले.