Ajit Pawar : ‘कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही’; अजित पवारांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्रिपदाचे सूत्र हाती घेताच मंगळवारी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या या दोन्ही विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
तसेच करसंकलन आणि महसूलवाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणत रिझल्ट ओरियंटेड काम करण्याचे निर्देश अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा. करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देखील अजित पवारांनी दिला आहे.
अजित पवारांनी यावेळी प्रलंबित योजना, आवश्यक निधी तसेच राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात वित्त नियोजन विभाग तसेच राज्य उत्पादन शुक्ल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर माहिती घेतली आहे.
या बैठकीत वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशीष शर्मा व इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देत राज्याच्या महसूल वाढीसाठी करचोरी, करगळतीसह गैरकारभार रोखण्याच्या सूचना दिल्या.
रिझल्ट ओरियंडेट काम करा
यावेळी अजित पवारांनी करसंकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येतील परंतु कामात परिस्थितीत हयगय चालणार नसल्याचे सांगत रिझल्ट ओरियंटेड काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच राज्यातील बेकायदा दारूविक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





