छगन भुजबळांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं; “… तर आम्ही मंत्रिमंडळासमोर हा विषय….”

Ajit Pawar| Chhagan Bhujbal | आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने फुले वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते मंडळीनी पुण्यातील फुले वाड्यात जात फुले दाम्पंत्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. आज सकाळापासूनच फुले वाड्यात नेते मंडळी दाखल व्हायला सुरुवात झाली होती.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्मारकाच्या जागेबाबत टोलवाटोलवी केली जात असल्याचे म्हटले होते. याविषयी भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका घेत उपोषण करायला मी मोकळा असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर अजित पवार यांनी काळजी करु नका अशी वेळ येणार नसल्याचे म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते भुजबळ ?
इथे अनेक लोक आहेत जे स्वत: महात्मा फुलेंच्या स्मारकासाठी जागा द्यायला तयार आहेत. पण अधिकारी त्यांना सांगतात की किती पैसे द्यायचे ते आम्हाला माहिती नाही, प्रक्रिया पूर्ण झाली नाही वगैरे. फक्त टोलवाटोलवी चालू आहे. मी काही उपोषण वगैरे करत बसत नाही. पण आता असं वाटतं की ठीक आहे, शेवटचा उपाय म्हणून बसू उपोषण करायला. मी सरकारमधल्या एका पक्षाचा एक आमदार आहे. त्यामुळे आता इथे उपोषण करायला मी मोकळा आहे. बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या की जरा अडचण होत, असे छगन भुजबळांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
अशी वेळ येणार नाही: अजित पवार
आपण विमानतळ, रेल्वे, शहरीकरणासाठी जागा अधिग्रहित करतो. त्याचे साधारण नियम ठरले आहेत. मी यासंदर्भात भुजबळांशीही बोलेन. अधिकाऱ्यांशीही बोलेन. असं नाहीये. आपल्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत की किती पैसे द्यायचे वगैरे. त्यात काही अडचणी असतील तर आम्ही मंत्रिमंडळासमोर हा विषय मांडून मार्ग काढू, असे अजित पवार म्हणाले. छगन भुजबळांना उपोषणाला बसायची वेळ येणार नाही अशी काळजी घेऊ, असे देखील अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.





