लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव केल्यानंतर शरद पवारांनी आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. बारामती मतदारसंघात अजित पवार यांना घेरण्याची रणनिती शरद पवारांनी आतापासूनच आखायला सुरुवात केली आहे. बारामती दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांच्या एन्ट्रीचे संकेत दिले. त्यामुळे बारामतीमध्ये काका अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार असा थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादा गटाकडून जय पवार हे रिंगणात उतरतील, अशी जोरदार चर्चा आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून नेमकं कोणाला तिकीट देणार यावर भाष्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून स्वत: रिंगणात न उतरता आपला मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’मी सात-आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलोय. आता मला रस नाही. जय पवार यांच्याबाबत जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील.’ असेही त्यांनी सांगितले त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोण आहेत युगेंद्र पवार? युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे चिरंजीव आहेत. शरयू अॅग्रोचे ते सीईओ आहेत. बारामती विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. शांत, संयमी आणि मितभाषी नेतृत्व असे गुण त्यांच्यात आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर युगेंद्र पवार यांनी आजोबा शरद पवारांना साथ दिली. लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या बाजूनं त्यांनी जोरदार प्रचार केला. सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.