Ajit Pawar : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ हा अपघात झाला. अजित पवार (Ajit Pawar) हे मुंबईतून सकाळी रवाना झाले होते आणि बारामतीमध्ये लँडिंग करत असताना विमानाचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीवर उतरताना अचानक जमिनीवर धडकले, त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला भीषण आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. दृष्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात सांगितले जात आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात विमान हवेत घिरट्या घालताना दिसत आहे. दुसऱ्या घिरटीदरम्यान विमान अचानक पलटी झाले आणि काही क्षणांतच अपघात झाल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. हे फुटेज सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये व्हायरल झाले असून, अपघाताच्या कारणांबाबत चर्चेला उधाण आले आहे. Ajit Pawar अपघातावर शंका अपघातानंतर राजकीय वर्तुळातून अजित पवार यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रथम चौकशीची मागणी केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही अपघाताबाबत शंका व्यक्त केली आहे. अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर भुजबळ यांनी भावूक आणि संभ्रमित प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले छगन भुजबळ? छगन भुजबळ यांनी सांगितले, “विमान घिरट्या घालत असताना अचानक पलटी झाल्याचे दिसत आहे. कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे. विमान दुसरी घिरटी घालत असताना अचानक पलटी मारल्याचे फुटेजमध्ये दिसते आणि त्यानंतर काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. मी तज्ज्ञ नाही, पण इंजिनमध्ये किंवा रडारमध्ये गडबड झाल्याचे वाटते. आणखी काही असू शकते. ठीक आहे, चौकशी होईल, त्याची माहिती समोर येईल. पण सोन्या सारखी माणसे गेली ती परत येणार नाहीत.” भुजबळ यांनी अपघाताच्या घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी धावपट्टी मोठी असतानाही विमान कसे कोसळले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. ते म्हणाले होते, “रनवे मोठा आहे, तरी हे कसे घडले? प्लेनमध्ये किंवा पायलटच्या चुकीमुळे झाले की काय?” असा प्रश्न उपस्थित केला होता.