‘दादा माझं शूटिंग सुरू आहे, मला यायला जमणार नाही…’; अजित पवारांकडून अमोल कोल्हेंची पोलखोल

Ajit Pawar | Amol Kolhe | Shirur Loksabha | Election 2024 : शिरुर लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. येथे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. आणि निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.
दरम्यान, अश्यातच पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला आहे. आज पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘जो माणूस राजीनामा द्यायाला निघाला होता. जो अभिनेता आहे, ज्यांनी पाच वर्षे काम केलं नाही. अमोल कोल्हे संसदेत जात नव्हते. कधी बैठकीला येत नव्हते.
सांगायचे की दादा माझं शूटिंग सुरू आहे. मला यायला जमणार नाही. ते कलाकार आहेत. त्यांना तुम्हाला वेळ द्यायला जमणार नाही. मला आधी म्हणाले होते की आता निवडणूक लढणार नाही. पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
‘अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार’; अमोल कोल्हे यांची घोषणा –
शिरुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी शरद पवार) उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. 5 वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे कोल्हे यांनी जाहीर केले आहे. राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचे क्षेत्र आहे.
मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझे प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही. गेल्या पंधरा वर्षांत मतदारसंघात प्रकल्प आले नाहीत. मात्र गेल्या पाच वर्षांत अनेक प्रकल्प आले, असे अमोल कोल्हे म्हणाले.
पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, ”माझ्या या निर्णयामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. मात्र शिरूरमधील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवायचे ठरवले आहे. मालिका विश्वात काम करत असताना पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही.
त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी मी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे एवढाच अपवाद राहिल. या व्यतिरिक्त मी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही’. असं देखील अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.





