‘अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं’

Ajit Pawar | महाविकास आघाडीच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे आणि इतर छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महायुतीच्या वज्रमुठीची ताकद दाखविली. मात्र निवडणूक पूर्ण होताच ही महायुतीची मूठ सैल झाल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांकडून अजित पवार गटामुळेच महायुतीचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात आला. यावरून राज्यातील राजकारण तापले असून आता अजित पवार गटातील नेत्यांकडूनही प्रतिउत्तर देण्यात येत आहे.
अशातच अजित पवार गटाचे नेते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी माध्यमांशी बोलतांना खळबळजनक वक्तव्य आहे. अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, असं मिटकरी म्हणाले आहे.
माध्यमांशी बोलतांना ते पुढे म्हणाले,’हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय.




