Jitendra Awhad : अजित पवार प्रचंड जातीयवादी माणूस; जितेंद्र आव्हाड यांची गंभीर टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवार हा प्रचंड जातीयवादी माणूस असून त्यांनी ओबीसी, एसटी आणि एससी यांना कधीही निधी दिला नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. जिथे फायदा तिथे पैसे फिरवायचे आणि त्यातून टक्केवारी मिळावायचे, असा आरोपही आव्हाड यांनी केला.
मंत्रिमंडळात असताना अजित पवार धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्यासारखे वागायचे. अर्थसंकल्पात प्रत्येक समाजासाठी तरतूद असते. मात्र, जेव्हा काटकसरीची वेळ येते तेव्हा ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या निधी कापला जायचा. अजित पवारांनी कायम ओबीसी, एससी आणि एसटी यांना पाहिजे तेवढा निधी दिला नाही. जिथे त्यांचा फायदा दिसेल, तिथे पैसे फिरवले जायचे, असेही आव्हाड म्हणाले.
समाज यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. यांना समाजापेक्षा विकास महत्त्वाचा वाटतो, कारण त्यातून जास्त टक्केवारी मिळते. कुणालाही विचारा. अजित पवार अर्थमंत्री असतानाही इतिहास काढा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आव्हाड म्हणाले, मी त्यांच्याच पक्षातील आमदार होतो, पण मला कधी निधी दिला नाही. अजित पवारांनी 200 कोटींचा हिशोब द्यावा.
कायम आयुष्यभर माझे वाईट चिंतणारे अजित पवार होते. ते अतिशय खुनशी आणि जातीयवादी माणूस आहे. अजित पवार मंत्रिमंडळात असताना के.सी पाडवी यांना ज्या पद्धतीने वागवायचे, हे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू यायचे. के.सी पाडवी महाराष्ट्रातला एकटा भ्रष्टाचारी आणि हा आरोप यांनीच लावला, अशी टीका आव्हाड यांनी केली.





