Ajit Pawar : बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर आज शासकीय इतमामात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खं बारामती आणि मोठा जनसागर लोटला होता. अत्यंत शोकाकुल वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. अजित पवार (Ajit Pawar) अशाप्रकारे अकाली ‘एक्झिट’ घेतील असे कुणालाच वाटले नव्हते. पण असे घडले आहे आणि यावर कुणालाच विश्वास बसत नाही आहे. अपघाताच्या पाच दिवस आधी अजित पवार यांनी आपल्या जवळचे शिलेदार आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दादांनी आपले मन पूर्णपणे मोकळे केले होते. किरण गुजर यांनी या भावुक संवादाबाबत सविस्तर माहिती दिली आहे, ज्यामुळे दादांच्या मनातील व्यथा आणि अस्वस्थता स्पष्ट होते. किरण गुजर सांगतात की, अजित पवार बरेच व्यथित आणि कंटाळलेले दिसत होते. पुण्यात इतकी मोठी विकासकामे केली, तरी महापालिका निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता.”दादा म्हणाले, ‘मला कंटाळा आलाय. आपण बाहेर जाऊया.’ आम्ही दोघे बाहेर गेलो, अर्धा दिवस फिरलो, एका ठिकाणी बसलो आणि जेवलो. त्यानंतर दादा म्हणाले, ‘मला नको वाटतंय आता. बास वाटतंय. या सगळ्या गोष्टीचा आता त्रास होतोय मला.'” दादांना असं का वाटू लागलं होतं, हे गुजर यांनाही पूर्णपणे समजत नव्हते. पण दादांना नेहमी खंत वाटायची “मी इतकं काम करतोय, मर मर मरतोय, रात्रंदिवस धावतोय, तरीही माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय?” त्यांना पक्षातील आणि राजकीय पराभवांमुळे मोठा त्रास होत होता. Ajit Pawar गुजर यांनी सांगितले की, दादा वारंवार म्हणायचे, “मला थांबावंस वाटतंय.” विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना लढायची इच्छा नव्हती. तेव्हा मी मुंबईत जाऊन त्यांना समजावले होते “दादा, बारामती पोरकी होईल. असं कसं चालेल?” त्यावर दादा म्हणाले, “मी इतकं करून जर लोकसभेला वहिनींच्या बाबतीत असं झालं तर, विधानसभेचं काय?” गुजर यांनी उत्तर दिले, “दादा, तसं होणार नाही. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, तुम्ही समजू घ्या.” बारामतीच्या राजकारणात होणाऱ्या टीकेमुळेही दादा व्यथित होते. ते विचारायचे, “मी कोणाचं वाईट केलंय? तरी माझ्यावर टीका का होते?” या सगळ्या गोष्टींमुळे अलिकडच्या काळात दादा अधिक अस्वस्थ झाले होते. अपघाताच्या दिवशी विमानात बसताना अजित पवार यांनी किरण गुजर यांना फोन करून निरोप दिला होता. गुजर विमानतळावर गेले होते आणि त्यांच्या डोळ्यासमोरच हा भीषण अपघात घडला.”विमानातून दादांना बाहेर काढलं. मी म्हणतोय, हे दादा आहेत, पण तरीही विश्वास बसत नव्हता. काल जे घडलं, त्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. डोळ्यात पाणी येतंय, कंठ दाटून येतोय.” किरण गुजर यांच्या या खुलाश्यामुळं अजित पवारांच्या अंतर्मनातील संघर्ष आणि थकवा स्पष्ट जाणवत होता. दादा राजकीयदृष्ट्या मजबूत होते, पण मनाने खचलेले होते. या अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, बारामती आणि संपूर्ण राज्य अजूनही शोकात बुडाले आहे. हे पण वाचा : PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाहीत पीएम किसान योजनेचे पैसे; नवीन अपडेट समोर