Ajit Gopchade : नांदेडमध्ये उभारणार देशातील पहिले ‘किन्नर भवन’; खा. डॉ. अजित गोपछडेंनी दिली माहिती

नवी दिल्ली : तृतीयपंथीयांच्या सामाजिक जीवनात बदल घडवून आणण्यासाठी नांदेडमध्ये देशातील पहिले किन्नर भवन उभारले जात असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना डॉ. गोपछडे म्हणाले की, भारतीय संस्कृतीत किन्नर समुदाय शुभ मानला जातो. त्यांना अर्धनारी नटेश्वर म्हटले जाते. लग्न समारंभ, नामकरण सोहळा अशा शुभप्रसंगी त्यांचे आगमन शुभ मानले जाते. युद्धाला जाण्यापूर्वी त्यांच्या कडून औक्षण होणे विजयाचे लक्षण मानले जायचे. तरीसुध्दा, तृतियपंथीयांना उपेक्षित जीवन जगावे लागते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून त्यांना लांब ठेवले जाते.
अशात, तृतियपंथीयांच्या जीवनात सन्मान, सुरक्षितता आणि स्थैर्य आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून गरीमागृह सारख्या योजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर नांदेडच्या कामठा येथे साडे तीन एकरात किन्नर भवन बांधले जात आहे. हे देशातील पहिले किन्नर भवन असून या ठिकाणी निवास व्यवस्था, स्मशानभूमी, वैद्यकीय व सामाजिक सुविधा, प्रशिक्षण आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे गोपछडे यांनी सांगितले.





