Ajit Doval : दहशतवादाबाबत दुटप्पी धोरण नको; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आवाहन

बीजिंग : दहशतवादाविरोधातल्या लढ्यामध्ये दुटप्पीपणा ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या २० व्या सुरक्षा परिषेदेमध्ये सहभागी होण्यासाठी डोवाल चीनला गेले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या जैश-ए-मोहंम्मद आणि अल-कायदा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना, तसेच इसिस, अल-कायदा आणि त्यांच्याशी संबंधित दहशतवादी गटांच्या कारवायांबद्दल भारताला तीव्र चिंता वाटत असल्याचे डोवाल यांनी यावेळी सांगितले.
पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करून डोवाल यांनी भारताने केलेली कारवाई नियंत्रित, योग्य प्रमाणातील आणि प्रतिहल्ल्यांना रोखणारी होती, असे सांगितले. या कारवाईतून दहशतवाद्यांना योग्य शिक्षा दिली गेल्याचेही त्यांनी सांगितले.
डोवाल यांनी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह यांच्याशी भारत-रशिया विशेष धोरणात्मक भागीदारीवर आधारित द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याच्या महत्त्वावर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी नेत्यांच्या दृष्टिकोनानुसार भारत-रशिया धोरणात्मक भागीदारीवर आधारित द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्याच्या महत्त्वाचा पुनरुल्लेख केला.





