Ajit Pawar – २८ जानेवारीला झालेल्या त्या दुर्दैवी अपघातात नियतीने अजितदादांसारखा धडाडीचा नेता आपल्यातून हिरावून नेला. महाराष्ट्रात ज्या नेत्यांकडे समाज मोठ्या आशेने बघतो, त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची ही कोणती पद्धत आहे? विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर आबा आणि आता अजितदादांनाही नियतीने हिरावले, असे मत ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. विधानसभेत दिवंगत शोक प्रस्तावावर भाषण करताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, निला देसाई या दिवंगत सदस्यांना देखील श्रध्दांजली अर्पण केली. जयंत पाटील म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाणांच्या मुशीतून शरद पवार साहेबांचे नेतृत्व सुरू झाले आणि त्यांचे संस्कार घेऊन अजितदादांनी आयुष्यभर काम केले. दादांची आणि आम्हा सर्वांची कारकीर्द ही एकाचवेळी सुरू झाली. आज दादांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आमच्या सगळ्यांवर येत आहे, असे ते म्हणाले. रोहित पवार म्हणाले, प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, जातीधर्माच्या पलिकडे काम करणारा नेता गेला. सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला. राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ठाकरेसेनेचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले, आज महाराष्ट्राचा आधारवड कोसळून पडला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार नावाच ब्रह्मकमळ अगदी मध्यानीला उमलले होते. कुणाची नजर लागली माहित नाही पण हे उमललेल ब्रह्मकमळ असच करपून नाश पावले. तो कठोर आवाज, तो करारी आवाज, तो कर्तव्यदक्ष आवाज आणि तितकाच आश्वासक आवाज आता दिसणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.