प्रमुख निवडकर्त्यांच्या शर्यतीत अजित आगरकर

नवी दिल्ली : माजी गोलंदाज अजित आगरकर याने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)च्या मुख्य निवडकर्त्याच्या पदासाठी अर्ज भरला आहे. या पदासाठी आतापर्यंत 8 जणांनी अर्ज दाखल केलेला आहे. यात नयन मोंगीया, राजेश चौहान, अमेय खुरासिया, ज्ञानेंद्र पांडेय और प्रीतम गांधी, चेतन शर्मा, लक्ष्मण शिवारामाकृष्णन यांचा समावेश आहे.
बीसीसीआयने माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांच्या जागेसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहे. या दोघांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. तर निवड समितीमधील इतर तीन सदस्य सरनदीप सिंह, जतिन परांजपे आणि देवांग गांधी कमेटीमध्ये असतील. त्यांचा कार्यकाळ 2020 च्या शेवटच्या महिन्यात संपणार आहे.
दरम्यान, 42 वर्षीय आगरकर यापूर्वी मुंबई सीनियर सलेक्शन कमेटीचे प्रमुख होते. आगरकरने भारतासाठी 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले असून एकूण 349 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यामध्ये तो तिसऱ्या स्थानी आहे. त्यांने 288 विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळेने 334 आणि जवागल श्रीनाथने 315 विकेट्स घेतल्या आहेत.





