Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
Satara ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘या व्यवसायामध्ये वारंवार चढउतार येत असलेने व कापसाच्या तुटवड्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने कापूस क्षेत्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा विदर्भ, मराठवाड्यामध्ये कापसाचे पीक पूर्णतः गेले आहे.

Satara: अडचणीच्या काळातही उत्तम नियोजन व बरेचसे धोरणात्मक निर्णय घेतल्याने अजिंक्यतारा सहकारी सूतगिरणी प्रगतीची वाटचाल करू शकली आहे. कापूस खरेदी करताना चांगल्या प्रतीचा कापूस कमीत कमी दरामध्ये तसेच पेमेंट कालावधी कमी ठेवलेने मिक्सिंग कॉस्ट कमी केली. त्यामुळे उतारा सुद्धा ८५ टक्क्यांवर मिळाला. त्याचा परिणाम चांगल्या दर्जाची सूत निर्मिती आणि बाजारामध्ये अजिंक्यतारा गिरणीच्या सूतास चांगला दर मिळवता आला. संस्थेने वेळेत कर्जाचे हप्ते व व्याज परतफेड केली असून सूतगिरणीची वाटचाल कौतुकास्पद आहे, असे मत संस्थेचे मार्गदर्शक व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
वळसे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी सूतगिरणीची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर झाली. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन उत्तमराव नावडकर होते. गिरणीचे व्हाइस चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, संचालक गणपतराव मोहिते, आबासो साबळे, अशोक कदम, राजकुमार कणसे, शशिकांत जाधव, भरत मतकर, रघुनाथ जाधव, सचिन गायकवाड, सुरेश टिळेकर, संजय कदम, अशोक काठाळे, शिवाजी भोसले, देवदत्त राजमाने, सौ. रत्नमाला डांगे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन नामदेवराव सावंत, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव सावंत, दिलीप निंबाळकर, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार, जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘या व्यवसायामध्ये वारंवार चढउतार येत असलेने व कापसाच्या तुटवड्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने कापूस क्षेत्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा विदर्भ, मराठवाड्यामध्ये कापसाचे पीक पूर्णतः गेले आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात कापसाचा तुटवडा जाणवून त्याचा परिणाम कापूस दरवाढीवर होणार आहे. त्यातच इराण युद्ध व आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात पूर्ण बंद आहे. त्याचाही परिणाम सूत व्यवसायावर जाणवत आहे. सूतगिरणीच्या वस्त्रोद्योगातील कामगार तुटवडा, कापड प्रक्रिया क्षेत्रातील अडचणी आदी बाबींमुळे वस्त्रोद्योगातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत आपल्या गिरणीचे कामकाज अत्यंत काटकसरीने व योग्य रीतीने चालविले जात असून संस्थेने नियोजनबद्ध कामकाज केले असल्याने सूत गिरणी नफ्याच्या दृष्टीने वाटचाल करू शकली.’’
सभेच्या प्रारंभी कै. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. चेअरमन नावडकर यांनी स्वागत केले. चीफ अकाउंटंट मानसिंग पवार यांनी श्रद्धांजली ठराव व नोटीस वाचन, अजेंड्यावरील विषय सादर केले, हे विषय बहुमताने मंजुर झाले. व्हाइस चेअरमन साळुंखे यांनी आभार मानले. सभेला पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, सदस्य प्रभाकर पवार, अजिंक्यतारा कृषी औद्योगिक ऊस तोडणी व वाहतूक संस्थाचे चेअरमन चंद्रकांत घोरपडे, अजिंक्यतारा ग्राहक मंडळाचे चेअरमन शरद पवार, मोहनराव जाधव, भानुदास मोहिते, जयवंत फडतरे, अंकुश डांगे, गिरणी सभासद व जनरल मॅनेजर सूर्यकांत देसाई, प्रॉडक्शन मॅनेजर रमेश निळकंठ, मिल इंजिनियर प्रदीप राणे, प्रवीण पवार, विजय केरेकर, सचिन शिंदे, सागर पडवळ, शिवाजी सावंत, प्रथमेश चव्हाण, प्रकाश सरोदे, दत्तात्रय काळंगे, कर्मचारी आणि महिला उपस्थित होत्या.





