Ajinkya Rahane Statement : अजिंक्यचं ‘ते’ विधान अन् ऑस्ट्रेलियाचं प्रत्युत्तर; २५ कोटींचा कॅमेरून ग्रीन का करत नाही गोलंदाजी? जाणून घ्या
Ajinkya Rahane Statement : सामन्यानंतर पत्रकारांनी जेव्हा रहाणेला ग्रीनच्या गोलंदाजीबद्दल विचारले, तेव्हा त्याने हात झटकले, असं त्याने का केलं जाणून घेऊया.

Ajinkya Rahane statement on Cameron Green : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होऊन अवघे दोन दिवस झाले असतानाच क्रिकेट वर्तुळात एका मोठ्या वादाने तोंड वर काढले आहे. २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) आमने-सामने आले आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ६ गडी राखून पराभव झाला. या सामन्यात २२१ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा बचाव करताना केकेआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. मात्र, सर्वांचे लक्ष वेधले ते आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू (२५.२० कोटी) कॅमेरून ग्रीन याच्याकडे. ग्रीनने या सामन्यात एकही ओव्हर टाकली नाही, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.
अजिंक्य रहाणेचे खळबळजनक विधान –
Question – why Cameron Green is not bowling?
Ajinkya Rahane – that question you should ask to Cricket Australia. pic.twitter.com/TNW2mXTId4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 29, 2026
सामन्यानंतर पत्रकारांनी जेव्हा केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला ग्रीनला गोलंदाजी का दिली नाही? असं विचारले, तेव्हा त्याने हात झटकत म्हटले की, “ग्रीनने गोलंदाजी का केली नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (CA) विचारा.” रहाणेच्या या गुढ विधानामुळे बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये काही ताणतणाव आहेत का, अशा चर्चांना उधाण आले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले स्पष्टीकरण?
अजिंक्य रहाणेच्या या विधानावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. सीएच्या प्रवक्त्याने सांगितले की, “कॅमेरून ग्रीनला पाठीच्या खालच्या भागात (Lower Back) दुखापत आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या १०-१२ दिवसांत गोलंदाजी करू शकणार नाही, हे आम्ही केकेआर व्यवस्थापनाला आधीच स्पष्टपणे कळवले होते. सध्या तो भारतातच रिहॅब पूर्ण करत असून लवकरच गोलंदाजीसाठी सज्ज होईल.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या खुलाशामुळे आता चेंडू केकेआरच्या कोर्टात आला आहे. जर व्यवस्थापनाला दुखापतीची कल्पना होती, तर रहाणेने असे विधान का केले? या वादाने आयपीएल २०२६ च्या सुरुवातीलाच एक मोठी खळबळ उडवून दिली आहे.





