Ajinkya Naik : अजिंक्य नाईक बिनविरोध! MCA अध्यक्षपदावर दुसरा कार्यकाळ पक्का, दिग्गजांची माघार

अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये दिग्गजांचा समावेश –
या अध्यक्षपदासाठी एकूण आठ जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये भारताच्या माजी कर्णधार डायना एडल्जी, भाजप आमदार प्रसाद लाड, शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्यासह ‘एमसीए’चे माजी सहसचिव शाहआलम शेख आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य सुरज समत यांचा समावेश होता. या सर्व दिग्गजांनी माघार घेतल्याने नाईक यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे.
आव्हाड आता उपाध्यक्षपदासाठी उत्सुक –
अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेले आमदार जितेंद्र आव्हाड आता उपाध्यक्षपदासाठी उत्सुक आहेत. या पदासाठी त्यांच्यासमोर ठाण्याच्या यंग स्टार्स क्रिकेट क्लबचे नवीन शेट्टी यांचे आव्हान असणार आहे. उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यासह अन्य सर्व पदांसाठी, तसेच कार्यकारी परिषदेच्या सदस्यत्वासाठी निवडणूक बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हेही वाचा – T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ साठी २० संघ निश्चित; ‘हा’ देश खेळणार पहिल्यांदाच वर्ल्ड कप!
अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध; उपाध्यक्ष, सचिवसह ४ पदांसाठी चुरस:
| पद | उमेदवार | स्थिती |
| अध्यक्ष | अजिंक्य नाईक | बिनविरोध |
| उपाध्यक्ष | जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी | चुरस |
| सचिव | शाह आलम शेख विरुद्ध डॉ. उन्मेष खानविलकर | चुरस |
| सहसचिव | गौरव पयाडे विरुद्ध निलेश भोसले | चुरस |
| खजिनदार (कोषाध्यक्ष) | अर्मान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे | चुरस |
निवडणूक वादाच्या भोवऱ्यात, पण उच्च न्यायालयाची परवानगी –
दरम्यान, ‘एमसीए’ निवडणुकीवरून आधी वादही निर्माण झाला होता. माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांच्यासह अन्य सदस्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. घटनेचे उल्लंघन आणि नियमबाह्यपणे १५५ हून अधिक क्लबना मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि काही अटींसह पुढील कार्यवाहीस परवानगी दिली. यामुळे ही निवडणूक ठरल्याप्रमाणे पार पडत आहे.





